मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला मिळणार गती, 20 हजार कोटी रुपयांच्या मदतीवर जपानची सकारात्मक प्रतिक्रिया


ठाणे, दि. 9 नोव्हेंबर (सिटी न्यूज मुंबई)
ठाणे जिल्ह्यात आगीच्या वाढत्या घटना आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता रॉकेट आणि अशाच प्रकारे हवेत उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 9 नोव्हेंबर 2026 ते 8 जानेवारी 2027 पर्यंत लागू राहील.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध भागांत आगीच्या घटनांमुळे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही नागरिक रॉकेट आणि हवेत उडणारे फटाके हातात धरून किंवा धोकादायक पद्धतीने उडवतात. निवासी इमारती, दाट लोकवस्ती असलेले भाग, बाल्कनी, गच्ची, पार्किंग आणि इमारतींच्या इतर भागांतून असे फटाके उडवल्यामुळे आगीचा धोका वाढत आहे.
सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी बंदी लागू राहील
ही बंदी संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीत लागू राहील. यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी जागा, इमारतींच्या गच्ची, बाल्कनी, परिसर आणि सर्व निवासी क्षेत्रांचा समावेश आहे.
उल्लंघन केल्यास होणार कायदेशीर कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागाला या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. हाऊसिंग सोसायट्यांनाही आपल्या सदस्यांपर्यंत या आदेशाची माहिती पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 51 आणि 60 अंतर्गत कडक कारवाई केली जाईल.
मात्र, इतर फटाक्यांचा वापर प्रचलित कायदे, सक्षम प्राधिकरणांचे आदेश आणि न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून करता येईल.
सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संस्थापक व मुख्य संपादक | सिटी न्यूज मुंबई







