भाजप–शिवसेना–राष्ट्रवादीचे दावे आमनेसामने....; कोणाची जागा कुणाला..?
आज फडणवीस–शिंदे–सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत कोंडी फुटणार?
मुंबई, दि. 30(अनंत नलावडे)- आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेचही आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.कारण पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघां पासून नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती पर्यंतच्या जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावे केल्याने सत्ताधारी आघाडीसमोर अंतर्गत समन्वयाची मोठी परीक्षा उभी राहिली आहे. कालच्या समन्वय समितीच्या चर्चेनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणत्या मतदारसंघात कोणाचा दावा मान्य आणि कुणाला माघार यावर तोडगा निघतो का, याची उत्सुकता आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार अंतिम फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही.
पुणे ठरतेय महायुतीची खरी कसोटी.....
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांवरून महायुतीतील रस्सीखेच सर्वाधिक तीव्र झाली आहे.कारण पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विद्यमान आमदार आहेत.या जागेवर भाजपकडून शरद लाड आणि राजेश पांडे यांच्या नावांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे, तर राष्ट्रवादीकडून प्रताप ऊर्फ भैय्या माने यांचे नाव पुढे आहे. शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनीही या मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावरही भाजप आणि शिवसेनेचा दावा आमनेसामने आला आहे. शिवसेनेकडून मंगेश चिवटे आणि प्रा.डॉ. सचिन सानप यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात असताना भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपचे पारंपरिक असल्याचे म्हटले आहे.तर भाजपकडून कौस्तुभ गावडे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
नागपूरचा ‘गड’ आणि भाजपमधील अंतर्गत चुरस......
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.गंगाधरराव फडणवीस,नितीन गडकरी आणि प्रा.अनिल सोले यांच्याशी जोडल्या गेलेल्या या मतदारसंघात यावेळी पक्षांतर्गत इच्छुकांची चुरस चर्चेत आली आहे.त्यातही माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षाकडून शब्द मिळाल्याचा दावा केल्याचे सांगितले जाते, तर माजी आमदार प्रा.अनिल सोले यांनीही पुन्हा विधान परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगरातही दावा-प्रतिदावा...
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण हेच पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.तर दुसरीकडे भाजपकडून एम.के.देशमुख आणि किरण पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.त्यामुळे या जागेवरही महायुतीतील जागावाटप महत्त्वाचे ठरणार आहे.
अमरावतीत शिवसेनेचा दावा...; त्यात भाजपचीही मोर्चेबांधणी....
अमरावती शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या जागेवर शिवसेना दावा कायम ठेवण्याच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जाते.तर भाजपकडून डॉ.सुमित पवार, डॉ.संगीता शिंदे तसेच माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
पाच जागा, तीन पक्ष आणि एकच प्रश्न....फॉर्म्युला काय.....?
त्यामुळे आता पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या पाच जागांवर महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.त्यातही तीनही सत्ताधारी प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची वाढती संख्या आणि घटक पक्षांचे दावे पाहता नेतृत्वासमोर प्रत्येक पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसोबत विद्यमान प्रतिनिधित्व, स्थानिक समीकरणे आणि निवडणुकीतील व्यवहार्यतेचा ताळमेळ साधण्याचे आव्हान आहे.त्यामुळे आता आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होतो की चर्चा आणखी पुढे ढकलली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.प्रामुख्याने महायुतीतील अंतर्गत स्पर्धेचा शेवट सहमतीत होतो की एखाद्या घटक पक्षाला माघार घ्यावी लागते, हेच आता या विधान परिषद रणांगणातील सर्वात मोठे राजकीय कोडे ठरले आहे. .....................(समाप्त)..............