पर्युषण काळातील मांस-मासे विक्री बंदी मागे घ्या; मराठी एकीकरण समिती आक्रमक
City News Mumbai••92 व्ह्यूज•2 मिनिट वाचा
“मी शाकाहारी आहे म्हणून सर्वांनी मांस-मासे विक्री बंद करावी, हा तुघलकी निर्णय आहे
मीरा-भाईंदर, दि. ८ सप्टेंबर (सिटी न्यूज़ मुंबई)
पर्युषण काळात मांस व मासे विक्रीवर दोन दिवसांची बंदी घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.
शहरात धार्मिक तेढ, संघर्ष किंवा दंगलीची परिस्थिती निर्माण होईल असे निर्णय घेऊ नयेत. धर्म प्रत्येकाने स्वतः जपावा; मात्र तो इतरांवर लादू नये, अशी भूमिका समितीने मांडली. भारताच्या संविधानाने नागरिकांना दिलेले खान-पानाचे स्वातंत्र्य लक्षात घेऊन कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारचे बंधन घालू नये, असेही समितीने स्पष्ट केले.
जैन समाजाच्या पर्युषण पर्वाचा सन्मान असला तरी त्यासाठी स्थानिक आगरी-कोळी समाजातील मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा विचार कोण करणार?, असा सवाल समितीने उपस्थित केला. दोन दिवसांची विक्री बंद झाल्याने रोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे समितीने सांगितले.
समितीचे गोवर्धन देशमुख यांनी महापालिकेच्या निर्णयावर सवाल उपस्थित करताना म्हटले, “मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनीही टोपी घालावी, हे चालेल का? मग एका व्यक्तीच्या किंवा समाजाच्या आहाराच्या पद्धतीनुसार संपूर्ण शहरावर निर्णय कसा लादता येईल?”
“मी शाकाहारी आहे म्हणून सर्वांनी मांस-मासे विक्री बंद करावी, हा तुघलकी निर्णय आहे. महापालिकेने काढलेले पत्रक तातडीने मागे घ्यावे. ही दोन दिवसांची बंदी आम्हाला मान्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका समितीने घेतली.
महापालिका ठराव करते म्हणून तो निर्णय नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर लादता येत नाही. उद्या बहुमताच्या जोरावर कोणताही वेगळा ठराव करून संपूर्ण शहरावर तो लादला तर त्याला काय अर्थ राहील, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला.
“आपण इंग्रजांच्या राजवटीत नाही. आपण लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहोत, याचे भान महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवावे,” असे सांगत नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली.
समितीने महापालिका प्रशासनाला मांस-मासे विक्री बंदीचा निर्णय मागे घेऊन शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन केले आहे.