प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; ‘रशियन तेलावरून अमेरिकेसमोर सरेंडर का?’ असा सवाल
City News Mumbai••0 व्ह्यूज•2 मिनिट वाचा
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिका-भारत संबंधांवरून केंद्र सरकारवर अतिशय कडक शब्दांत टीका केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदी यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण केले असून, भारताच्या आर्थिक हितांचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात एक विस्तृत पोस्ट शेअर करत अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर आणि मोदी सरकारच्या मौनावर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या देशांनी स्वस्त रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिका त्यांच्यावर १००% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची धमकी देत आहे. परंतु, दुसरीकडे अमेरिकेच्या स्वतःच्या अणुऊर्जा उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रशियन ‘लो-एनरिच्ड युरेनियम’च्या (LEU) आयतीला मात्र त्याच कायद्यातून स्पष्ट सूट देण्यात आली आहे. अमेरिकेचा हा उघड दुटप्पीपणा पंतप्रधान मोदी उघडा का करत नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांना आपला “प्रिय मित्र” मानतात, तरीही अमेरिका भारताला आपल्या तालावर नाचवत आहे आणि मालकासारखी वागणूक देत आहे. मोदी नक्की कसली भीती वाटत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
चीनच्या मुद्द्यावरून अमेरिकेवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, चीन हा भारताच्या तुलनेत कितीतरी जास्त रशियन तेल खरेदी करतो, तरीही गेल्या वर्षी अमेरिकेने केवळ भारतावर अतिरिक्त २५% टॅरिफ लादले होते. चीन प्रत्युत्तरा दाखल कारवाई करेल या भीतीपोटी अमेरिकेने त्यांच्यावर हे टॅरिफ लावले नाही. यावरून अमेरिका चीनला घाबरते आणि भारताला आपला ‘गुलाम’ समजते, असा आरोप त्यांनी केला.
शेवटी, अमेरिकेकडे पंतप्रधान मोदींच्या काळ्या कारभाराची किंवा रहस्यांची संपूर्ण फाईल आहे का, असा खळबळजनक प्रश्न विचारत आंबेडकर यांनी थेट हल्ला चढवला. याच भीतीपोटी मोदींनी स्वतःला आणि देशाच्या आर्थिक हितांना अमेरिकेसमोर पूर्णपणे सरेंडर केले आहे आणि आपली काळी रहस्ये लपवण्यासाठी ते भारताला पुन्हा एकदा एका परदेशी देशाचा गुलाम बनवत आहेत, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.