एमपीएससी आंदोलनाला राजकीय वळण"....; विद्यार्थ्यांनी राजकारण्यांपासून दूर राहावे......!
City News Mumbai••0 व्ह्यूज•3 मिनिट वाचा
भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांचे आवाहन..; बहुतांश मागण्या मान्य, असंवैधानिक मागणीवरूनच सरकारचा आक्षेप...
मुंबई, दि. 23(अनंत नलावडे)- गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय वळण लागल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांनी राजकीय स्वार्थासाठी होणाऱ्या दिशाभुली पासून दूर राहावे, असे आवाहन भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी येथे केले. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित प्रश्न चर्चेतून सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आंदोलन राजकीय आखाडा बनण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी राहणे आवश्यक असल्याचेही पाचपुते यांनी आवर्जून नमूद केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते यांनी एमपीएससी आंदोलनातील मागण्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली."आंदोलकांच्या सुरुवातीच्या १२ पैकी ११ मागण्या ऐकण्यास मुख्यमंत्री तयार आहेत.मात्र बारावी मागणी घटनात्मकदृष्ट्या शक्य नसल्याने ती मान्य करता येणार नाही,” असा दावाही त्यांनी केला.
त्यातही प्रामुख्याने एमपीएससीच्या अध्यक्षांना हटविण्याच्या मागणीवरही पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यघटनेच्या कलम ३१७ मध्ये आयोगाच्या अध्यक्ष अथवा सदस्यांना हटविण्याच्या प्रक्रियेबाबत तरतूद असून, अशा बाबतीत राष्ट्रपतींच्या अधिकारांचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे अधिकारक्षेत्रा बाहेरील मागणीवरून आंदोलन चिघळविण्यापेक्षा उपलब्ध घटनात्मक मार्गांचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘विद्यार्थ्यांच्या भावनेवर राजकारण नको’....
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देत पाचपुते म्हणाले की, आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी दुष्काळग्रस्त भागातील आहे.त्यांच्या भावनिक परिस्थितीचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ नये.विद्यार्थ्यांना आंदोलनापेक्षा अभ्यासासाठी वेळ आणि संधी मिळणे महत्त्वाचे आहे, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
सरकारकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली ४ सप्टेंबर रोजी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा दौरा सुरू आहे.समितीच्या सदस्यांनी काही ठिकाणी विद्यार्थ्यांशी तब्बल आठ तास चर्चा केली असून सुमारे ११०० विद्यार्थी अथवा त्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे थेट ऐकून घेतल्याचाही दावा पाचपुते यांनी केला.जर "समिती इतक्या तपशीलाने विद्यार्थ्यांशी चर्चा करत असेल तर आंदोलकांच्या शंका, आक्षेप आणि मागण्या समितीसमोर मांडाव्यात,” असेही आवाहन त्यांनी केले.
‘राजकीय नेत्यांचा सहभाग वाढतोय’....
दरम्यान, आंदोलनात काँग्रेसच्या युवक संघटनेचे अध्यक्ष सहभागी झाल्याचा दावा करत पाचपुते यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.राहुल गांधीही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच सीजेपीचे आंदोलनही सुरू असून, या संपूर्ण आंदोलनाला सरकारविरोधी राजकीय आंदोलनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
फडणवीस सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही......
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्याची असल्याचे पाचपुते म्हणाले."गरज पडल्यास सरकारची बदनामी झाली तरी चालेल; मात्र विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग संघर्षाऐवजी चर्चेचा असावा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती व सरकारशी संवाद साधावा, अशीही अपेक्षा पाचपुते यांनी व्यक्त केली.
२६ सप्टेंबरच्या आंदोलनावरूनही सवाल.....
पुण्यात आंदोलनासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचा उल्लेख करत पाचपुते यांनी २६ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या नियोजित तारखेवर प्रश्न उपस्थित केला. गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ४८ तास बंदोबस्त असतो.त्यामुळे त्या काळात आंदोलनाला परवानगी मिळणे अवघड असल्याची माहिती असतानाही २६ सप्टेंबरचीच तारीख निवडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला."सरकार आंदोलन करू देत नाही, असे चित्र निर्माण करण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे,” असा आरोप करत पाचपुते यांनी हा प्रकार थांबवण्याचे आवाहन केले.मात्र या आरोपांबाबत रोहित पवार यांची स्वतंत्र प्रतिक्रिया या निवेदनात देण्यात आलेली नाही.
एमपीएससी भरतीबाबत आगामी काळात विक्रमी भरती करण्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे, असा दावा करत पाचपुते यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संवादाच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडावेत आणि राजकीय हस्तक्षेपापासून आंदोलन दूर ठेवावे, असे आवाहन केले.