वाटदच्या प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरबाबत आठवडाभरात निर्णय; ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
City News Mumbai••0 व्ह्यूज•3 मिनिट वाचा
रत्नागिरी |(सिटी न्यूज़ मुंबई) रत्नागिरी तालुक्यातील वाटद औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या मनातील शंका, जमीनविषयक प्रश्न आणि प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य निर्बंधांचा सविस्तर आढावा घेऊन येत्या आठवडाभरात पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते डॉ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाटद एमआयडीसी विरोधा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज डॉ. उदय सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत संघर्ष समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी सरकारने समितीचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल समितीच्या वतीने प्रथमेश गवाणकर यांनी डॉ. सामंत यांचे आभार मानले. डिफेन्स क्लस्टरच्या पुनर्विचाराची मागणी सकारात्मकतेने स्वीकारली वाटद एमआयडीसीविरोधी संघर्ष समितीने प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ही मागणी शासनाने सकारात्मकतेने घेतली असून, प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि वहिवाटदार यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खात्री करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
1000 एकरांवरील संभाव्य निर्बंधांचा अहवाल मागविला डिफेन्स क्लस्टरसाठी प्रस्तावित सुमारे 1000 एकर क्षेत्रामुळे कोणत्या स्वरूपाचे निर्बंध लागू होऊ शकतात, त्याचा स्थानिक नागरिकांवर काय परिणाम होईल आणि प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कोणत्या असतील, याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अहवाल लवकर प्राप्त झाल्यास त्याआधारे त्यापूर्वीही निर्णय घेता येईल, अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
घर, मंदिर आणि बागायती जमिनींना धक्का लागणार नाही वाटद येथे कोणताही प्रकल्प राबविताना स्थानिकांची घरे, मंदिरे, शेतीची जमीन तसेच आंबा आणि काजू बागायतीची जमीन बाधित होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका डॉ. सामंत यांनी मांडली. ग्रामस्थांच्या हिताला बाधा येईल अशा पद्धतीने एमआयडीसीचा विस्तार केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरांवरील नोंदी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश वाटद परिसरातील घरांवर काही प्रकारच्या नोंदी अथवा बोजे असल्यास, त्याची तातडीने तपासणी करून संबंधितांच्या घरांच्या नोंदी स्पष्ट करण्याच्या सूचना डॉ. उदय सामंत यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वहिवाटीच्या दाव्यांमध्ये गुणवत्तेनुसार निर्णय वहिवाटीशी संबंधित प्रलंबित दाव्यांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता प्राधान्यक्रम आणि गुणवत्तेच्या आधारे सातबारा नोंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात प्रांताधिकारी आणि कृती समितीची 28 किंवा 29 सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती डॉ. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
गावनिहाय संवादातून गैरसमज दूर करणार डिफेन्स क्लस्टरसह भविष्यातील कोणताही औद्योगिक प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुढे नेण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी गावनिहाय संवाद बैठका घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी, अपेक्षा आणि शंका समजून घ्याव्यात, अशा सूचना दिल्याचे डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.
प्रांताधिकारी नोडल अधिकारी वाटद एमआयडीसी आणि डिफेन्स क्लस्टरशी संबंधित विविध बाबींच्या समन्वयासाठी प्रांताधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनिक पातळीवर समन्वय आणि पारदर्शकता राखण्यावर भर दिला जाणार असल्याचेही डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांना रोजगारात प्राधान्य वाटद परिसरात उद्योग येताना स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योगांनी स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य द्यावे, अशी भूमिका शासनाने सातत्याने घेतली आहे. स्थानिकांच्या हिताचे संरक्षण आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही डॉ. सामंत यांनी दिली.
पर्यावरणपूरक उद्योगांनाच प्राधान्य एमआयडीसी परिसरात उद्योग उभारताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. झिरो डिस्चार्ज आणि पर्यावरणीय निकषांचे पालन हे उद्योगांसाठी महत्त्वाचे राहणार असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
उद्योगविकास आणि स्थानिक हित यांचा समतोल वाटद परिसरात आधीपासूनच विविध औद्योगिक आणि बंदरविषयक प्रकल्प कार्यरत आहेत. भविष्यातील उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगार, आर्थिक संधी आणि विकासाचा लाभ मिळावा, मात्र त्याचवेळी स्थानिकांच्या हक्कांवर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाची भूमिका संतुलित राहील, असा विश्वास डॉ. उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
संवादातून समन्वय आणि समन्वयातून समाधान वाटद डिफेन्स क्लस्टरच्या प्रश्नावर संघर्षाऐवजी संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर भर देण्यात येत आहे. “संवाद, समन्वय आणि समाधान” या भूमिकेतून प्रशासन, ग्रामस्थ आणि कृती समिती यांच्यात चर्चा सुरू ठेवून सर्वांच्या हिताचा मार्ग शोधला जाईल, असे डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.