तुकाराम मुंढें यांच्या धडक मोहिमेआड अधिकाऱ्यांकडून मोठी "लूट".....?
City News Mumbai••9 व्ह्यूज•2 मिनिट वाचा
संजय राऊतांचे थेट आयुक्तांना तीन पानी पत्र.....; "क्लोजिंग" च्या नावाने ७५ हजार ते २ लाखांची वसुली......? अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी......!
मुंबई, (अनंत नलावडे)- राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यभरत होत असलेल्या धडक कारवाईमुळे भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच, याच मोहिमेच्या आड छोट्या व्यावसायिकांकडून विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कथित खंडणीवसुलीचे गंभीर आरोप पुढे आले आहेत.पूर्वी ज्या "क्लोजिंग नोटीस" साठी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याचे बोलले जात असताना आता हाच कथित दर आता थेट ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याहून धक्कादायक दावा ठाण्यातील एका क्विक कॉमर्स कंपनीच्या परवान्याशी संबंधित आहे.त्यांचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने १७ ते १८ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांमुळे FDA मधील धडक कारवाईच्या आड नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची थेट दखल घेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वसुलीचे गंभीर आरोप असलेले तीन पानी पत्र पाठविले आहे.त्यात खा.राऊत यांनी सुरुवातीला मुंढे यांच्या धडाडीच्या कारवाईचे स्वागत करतानाच, या मोहिमेचा गैरफायदा घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच राऊत यांनी पत्रातून बनावट तक्रारींची स्वतंत्र चौकशी, नियमानुसार नोटीस व सुनावणीची प्रक्रिया न पाळता कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई आणि परवाना निलंबन तसेच पुनर्स्थापनेची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याचीही आग्रही मागणी केली आहे.
अन्न भेसळ रोखण्यासाठीची कठोर मोहीम ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असली, तरी तिच्या नावाखाली नियमबाह्य दबाव किंवा कथित वसुली होत असेल तर त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.त्यामुळे मुंढे यांच्या धडक मोहिमेची पुढची परीक्षा आता कारवाई किती झाली यापेक्षा ती किती पारदर्शकपणे झाली, यावर होणार आहे. ................,........(समाप्त)...............