१०८ रुग्णवाहिकांवर मोदींचा ‘फोटो’, जनतेच्या सेवेलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय रंग.......?
City News Mumbai••0 व्ह्यूज•4 मिनिट वाचा
मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे देशभर ‘सेवा संकल्प’ अभियान...; सरकारी आरोग्यसेवेच्या वाहनांवरील मोठ्या छायाचित्राची राजकीय चर्चा.....!
मुंबई, दि. 22(अनंत नलावडे)- रुग्णाच्या जीवाशी थेट संबंध असलेली १०८ रुग्णवाहिका सेवा आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होत असतानाच या रुग्णवाहिकांच्या मागील बाजूस लावण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या छायाचित्रामुळे या "सेवे" भोवती राजकीय चर्चेलाही तोंड फुटले आहे.त्याला कारण म्हणजे, एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पातून तब्बल १,७५६ नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे...; तर दुसरीकडे मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने देशभर सुरू केलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाशी’ या रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाची सांगड घातली जात असल्याने ही नेमकी "सरकारी आरोग्यसेवा की राजकीय ब्रँडिंग"......? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
भाजपने देशभरात पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानात जनसेवा, रक्तदान, आरोग्य, स्वच्छता आणि विविध जनसंपर्क उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.त्यात महाराष्ट्राच्या राजभवनानेही १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे शंका कुशकांना वेग आला आहे.
रुग्णवाहिका जरी अत्याधुनिक....; तरी फोटोची चर्चा अधिक......!
नव्या रुग्णवाहिकांमध्ये ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्षन पंप आणि ऑक्सिजन वितरण प्रणाली यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.रुग्णवाहिकेतून रुग्णालयातील डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच आपत्कालीन उपचाराच्या "गोल्डन अवर" मध्ये रुग्णाला वैद्यकीय मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने या वाहनांची क्षमता वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्राची १०८ सेवा २४ तास आणि मोफत आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी कार्यरत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीत नमूद आहे.
मात्र या आरोग्यसेवेच्या वाहनांच्या मागील भागावर मोठ्या आकारात मोदींचा फोटो दिसत असल्याने सरकारी सेवेच्या वाहनांवर राजकीय व्यक्तिमत्त्वाचे छायाचित्र वापरण्याच्या औचित्याचा मुद्दाही त्यामुळे अधिक चर्चेत आला आहे.विशेषतः मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभर भाजपचा ‘सेवा संकल्प’ कार्यक्रम सुरू असतानाच या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याची तयारी असल्याने "आरोग्यसेवा आणि राजकीय जनसंपर्क यांची सीमारेषा नेमकी कुठे आहे"....? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
१,७५६ रुग्णवाहिकांचा महाताफा......
या प्रकल्पात २५५ अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट (ALS) आणि १,२०४ बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिकांचा समावेश आहे. याशिवाय ३६ नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिका, १६६ दुचाकी रुग्णवाहिका, १५ नदी-बोट रुग्णवाहिका आणि १० समुद्री-बोट रुग्णवाहिका, असा एकूण १,७५६ वाहनांचा ताफा तयार होत आहे.यापैकी सध्या तातडीने १५० रुग्णवाहिका ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ नागरिकांच्या सेवेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यातील सुविधांची माहिती घेतली. आणि त्यांनी काही बदल व सुधारणा सुचवून या रुग्णवाहिका लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही दिल्या.
‘सेवा’ चा लाभ जनतेला...; पण श्रेय कोणाचे.....?
रुग्णवाहिका ही मूलतः शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे तिच्यातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि वेगवान सेवा यांचा थेट फायदा रुग्णांना मिळणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणे अपेक्षित आहे.मात्र नेमक्या त्याचवेळी वाहनांवरील राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांमुळे सरकारी योजनेचा राजकीय प्रचारासाठी वापर होत आहे का, यावरूनही पुढे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
कारण भाजपच्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उद्देश मोदींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांशी जोडून जनसेवा आणि विविध सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार करणे असा पक्षाने सांगितला आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाची वेळ, अभियानाचा संदर्भ आणि वाहनांवरील मोदींचे छायाचित्र या तिन्ही बाबी एकत्र आल्याने या उपक्रमाकडे केवळ आरोग्यसेवेच्या विस्ताराच्या दृष्टीने पाहायचे की त्यातील राजकीय संदेशाचाही विचार करायचा, हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे.मुळात आरोग्यसेवेचा वेग वाढला, रुग्णांना जीवनदायी सुविधा मिळाल्या तर त्याचे स्वागतच; पण सार्वजनिक पैशातून उभारलेल्या सेवेच्या वाहनांवरील राजकीय प्रतिमांबाबत शासनाची भूमिका आणि त्यामागील अधिकृत निकष स्पष्ट होणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
‘१०८’च्या ताफ्यात नेमके काय......?
१,७५६ — एकूण रुग्णवाहिका २५५ — ALS १,२०४ — BLS ३६ — नवजात बालकांसाठी १६६ — दुचाकी रुग्णवाहिका १५ — नदी-बोट रुग्णवाहिका १० — समुद्री-बोट रुग्णवाहिका अत्याधुनिक सुविधा : ईसीजी | ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर | पल्स ऑक्सिमीटर | सक्षन पंप | ऑक्सिजन वितरण प्रणाली | डॉक्टरांशी थेट संवाद
सेवा’च्या वाहनाला "ब्रँडिंग" चा रंग.....?
मोदींचा वाढदिवस → ‘सेवा संकल्प अभियान’ → सरकारी रुग्णवाहिकांचे लोकार्पण → वाहनांवर मोदींचा फोटो या सलग घटनाक्रमामुळे सरकारी आरोग्यसेवेचा विस्तार आणि सत्ताधारी पक्षाचा जनसंपर्क यांची सांगड घातली जात असल्याची चर्चा होऊ शकते.त्यामुळेच या सेवा वाहनातून नेमका कोणाचे "राजकीय ब्रेंडिंग" केले जात आहे हे पाहणे अधिक ओत्सुक्याचे ठरणार आहे. .