७२ वर्षांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची परंपरा मोडून केवाडियात सोहळा......; "गुजरातच का"...?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा केंद्राला घणाघाती सवाल.........!
कलाकारांना राज ठाकरेंचे आवाहन—आता तरी आवाज उठवा......!
मुंबई, दि.१०(अनंत नलावडे)- देशाच्या राजधानीत सात दशकांहून अधिक काळ रुजलेली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची परंपरा अचानक गुजरातच्या "केवाडियात" नेण्याची गरज काय....? हा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला आहे."राष्ट्रीय" नावाच्या प्रत्येक गोष्टीचा पत्ता हळूहळू गुजरातकडे का वळतोय....? असा सवाल करताना त्यांनी हा केवळ एका पुरस्कार सोहळ्याच्या स्थळाचा विषय नसून देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय केंद्रबिंदू विषयीचा गंभीर प्रश्न असल्याचेही खरमरीत शब्दात नमूद करत आपला संताप व्यक्त केला.
"गुजरातच का".....? तर हा साधा प्रश्न आहे...! पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर घ्यायचा असेल तर मुंबई का नाही....? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा महाराष्ट्र का नाही....? देशातील प्रभावी चित्रपटसृष्टी असलेल्या तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा विचार का नाही....? केवाडियाच का....? असा रोखठोक व खडा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
देशाच्या चित्रपट इतिहासात महाराष्ट्राचे योगदान निर्विवाद असताना राष्ट्रीय पुरस्कारांचा सोहळा महाराष्ट्रात घेण्याची संधी का दिली जात नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. "राष्ट्रीय" म्हणा आणि पत्ता गुजरातचा द्या....! कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना गुजरातमध्ये, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्यांत गुजरातला विशेष स्थान, मुंबईशी जोडलेल्या आर्थिक महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत गुजरातकडे झुकते माप या निर्णयांची मालिका पाहता देशातील प्रत्येक मोठ्या गोष्टीचा केंद्रबिंदू गुजरातमध्येच निर्माण करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना.....? असाही खासा राजकीय सवाल ठाकरे यांनी खास आपल्या ठाकरी शैलीत उपस्थित केला.
त्यांच्या मते, भारताची प्रगती ही कोणत्याही एका राज्याची मक्तेदारी नाही.अनेक पिढ्यांचा त्याग, देशातील प्रत्येक प्रांताचे श्रम, उद्योग, कला, संस्कृती आणि योगदान यावर हा देश उभा आहे.त्यामुळे एखाद्या राज्याला वारंवार राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांचे व्यासपीठ देऊन त्यातून वेगळा राजकीय संदेश निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यावर प्रश्न विचारणे गरजेचे असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
"इतिहास घडवायचा की इतिहासाची जागा बदलायची"......?
"स्वतःला काही निर्माण करता आले नाही की नावं बदला, स्थळं बदला आणि त्यातून नवा इतिहास निर्माण करा,’ अशी बोचरी टीका करत ठाकरे यांनी स्पष्ट केले की,देशाच्या इतिहासातील महत्त्वाच्या संस्था, परंपरा आणि राष्ट्रीय कार्यक्रम यांना भौगोलिक राजकारणाच्या चौकटीत बसवले जाऊ लागले तर उद्या "राष्ट्रीय" या शब्दाचाही अर्थ बदलण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आज पुरस्कार केवाडियात.....; उद्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी गुजरातमधील स्थळ असणेच निकष ठरेल का....? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
राजकीय अर्थ | "गुजरात मॉडेल" चा सांस्कृतिक विस्तार.....?
हा वाद केवळ चित्रपट पुरस्कारांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही.तर आर्थिक गुंतवणूक, क्रीडा, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि आता सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय व्यासपीठे या सर्वांमध्ये गुजरातला मिळणाऱ्या प्राधान्याची राजकीय मांडणी विरोधकांकडून होऊ शकते.देशाचे आर्थिक आणि सांस्कृतिक वैभव एका राज्याच्या नावावर लिहिण्याचा प्रयत्न होतोय का...? हा प्रश्नही महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांसाठी विशेष संवेदनशील ठरू शकतो. मात्र, पुरस्कार सोहळा "केवाडियात" हलविण्यामागील केंद्र सरकारचे अधिकृत कारण काय आहे, हे स्पष्ट होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या राजकीय प्रश्नाला सरकारच्या स्पष्टीकरणाचीही जोड मिळणे आवश्यक आहे.
कलाकारांनो, आता तरी तोंड उघडा.....!
राज ठाकरे यांनी या प्रकरणात देशभरातील कलाकारांनी भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.सरकारच्या स्तुतीची गाणी गाण्यासाठी कलाकार तत्पर असतात.....; मात्र सांस्कृतिक परंपरा आणि संस्थात्मक स्वायत्ततेच्या प्रश्नांवर ते गप्प राहतात, अशीही टीका त्यांनी केली."मुद्दा केवाडिया किंवा दुसरे शहर हा नाही....; तर देशाच्या राजधानीत या पुरस्काराची जी उज्ज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे, यावर कलाकारांनी बोलले पाहिजे,’ असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.कारण त्यांच्या मते, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांनी या विषयावर कणखर भूमिका घेतली नाही तर भविष्यात राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक निर्णयांमध्ये प्रादेशिक समतोलाचा प्रश्नही अधिक गंभीर होऊ शकतो.
"गुजराती बांधवांनो, या गुदगुल्यांना भुलू नका"......!
गुजराती समाजालाही ठाकरे यांनी थेट आवाहन करत आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे म्हणून होणाऱ्या गुदगुल्या सत्तेचा काळ संपल्यानंतर अस्वलाच्या गुदगुल्या ठरू शकतात, असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला.त्याचवेळी अशा उपडव्यापामुळे यापुढे देशातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, उद्योगांवर आणि व्यावसायिक हितांवर होणाऱ्या परिणामांचा हिशेब ठेवतील, असा इशाराही त्यांनी दिला. “देश गुजरातच्या विरोधात नाही; पण ‘देश म्हणजे गुजरात’ अशी नवी व्याख्या कुणी करू लागले, तर त्याला प्रश्न विचारलेच पाहिजेत"....!
बॉक्स........
राज ठाकरेंचे थेट सवाल...
१. ७२ वर्षांची परंपरा मोडण्याचे कारण काय.....?
२.दिल्लीऐवजी केवाडियाच का...?
३.दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला संधी का नाही....?
४.दक्षिणेतील चित्रपटसृष्टीच्या योगदानाचा विचार का नाही......?
५.प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी गुजरातच का.....?
आता राज ठाकरे यांनी आज जी परखड भूमिका स्पष्ट केली त्यावरून आता पुढे काय हा प्रश्न निर्माण झाल्याने आता यावर केंद्राचे स्पष्टीकरण → कलाकारांची भूमिका → महाराष्ट्राची प्रतिक्रिया → दक्षिणेतील राज्यांचा विरोध → ‘राष्ट्रीय’ कार्यक्रमांच्या विकेंद्रीकरणाची नवी चर्चा अशा अनेक नव्या उपप्रश्नांची साखळी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांचा प्रश्न केवळ "कुठे"....? एवढाच नाही; खरा सवाल आहे, "का"....? याचा. आणि त्या "का" चे उत्तर कोण देणार.....? हा खरा मूळ प्रश्न आहे. ......................... (समाप्त)...............