265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर....; तरी यादीबाहेरील तालुक्यांचीही तपासणी....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठोस ग्वाही......!
मुंबई, दि. 27(अनंत नलावडे )- राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांनाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. या तालुक्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार ‘ट्रिगर-3’ अंतर्गत मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांबाबत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील मदत, पिण्याचे पाणी, रब्बी हंगाम आणि पूरस्थिती याबाबत शासनाची भूमिका ठामपणे स्पष्ट केली.
पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांच्या आधारे प्रभावित झालेल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, तेथे 12 उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण करून देण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यादीत नसले तरी मदतीचा मार्ग खुला......
दुष्काळाच्या यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, अशा सर्व तालुक्यांची तपासणी करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार ‘ट्रिगर-3’मध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे निकषांमध्ये न बसल्याने सध्या यादीबाहेर असलेल्या भागांनाही पुढील तपासणीनंतर मदतीचा मार्ग खुला होणार आहे.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य.....
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे.त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यातील बहुतांश जलप्रकल्पांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असल्याने जुलै-ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून, त्यानंतर उपलब्ध अतिरिक्त पाण्याचा रब्बी हंगामासाठी वापर करता येईल का, याचा पाण्याच्या उपलब्धतेनुसार विचार केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही अभ्यास करण्यात येत असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत परिस्थिती उच्चांक पातळीवर जाण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्याचवेळी दुष्काळात जनतेचेही सहकार्य आवश्यक दुष्काळी परिस्थितीचा सामना केवळ शासनाच्या उपाययोजनांनी न करता जनतेनेही सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागांना शक्य ती मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पूरग्रस्तांना प्रशासनाकडून संपूर्ण मदत देण्यात येत असून, आपण प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगत, पूरस्थिती आता निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ..................