सारथीला १२२ कोटी.....; तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटी...... यापूर्वी ४५० कोटी.....!
City News Mumbai••2 व्ह्यूज•2 मिनिट वाचा
मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना निधीचा ‘बूस्टर’; पुढील शैक्षणिक वर्षापासून आठ वसतिगृहे सुरू करण्याचे नियोजन....
मुंबई, दि.२९ (अनंत नलावडे)-राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना गती देतानाच आर्थिक विकासाच्या योजनांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) १२२ कोटी ३४ लाख ६० हजार रुपये, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे दिली.
सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शैक्षणिक शिष्यवृत्तीचाही मोठ्या प्रमाणात लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. आता वसतिगृहांच्या उभारणीला निधी मिळाल्याने या कामांना आणखी गती मिळणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सारथी संस्थेला निधीची उपलब्धता करून देण्यात आली असून, वसतिगृहांच्या बांधकामासाठी १२२ कोटी ३४ लाख ६० हजार रुपयांच्या निधी मंजुरीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे,अशी माहितीही विखे पाटील यांनी दिली.
राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींच्या क्षमतेची आठ वसतिगृहे उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.आता पुढील शैक्षणिक वर्षापासून ही वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी अर्थसंकल्पात ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी यापूर्वी ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणखी १५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशीही माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.