दुष्काळाच्या बांधावरून शरद पवारांचा सरकारला घेराव.......! १०० टक्के कर्जमाफीची मागणी...; मुख्यमंत्र्यांच्या भेटीत मांडणार बळीराजाचे प्रश्न....
City News Mumbai••1 व्ह्यूज•3 मिनिट वाचा
पाणीटंचाई, करपलेली पिके, वीजपुरवठा आणि दुष्काळी यादीतून वगळलेल्या तालुक्यांचा मुद्दा ऐरणीवर...
मुंबई, दि.2(अनंत नलावडे)- राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेती आणि शेतकरी संकटात सापडले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत दुष्काळाच्या प्रश्नावरून सरकारचे लक्ष वेधले आहे.त्यात त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड तालुक्यांच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी करपलेली पिके, आटत चाललेले पाझर तलाव आणि पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावांची परिस्थिती जाणून घेतली.तसेच अशा भीषण समयी शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी, पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर, दुष्काळी यादीतून वगळलेल्या भागांचा समावेश आणि वीजपुरवठा खंडित न करण्याची मागणी करत पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारसमोर आव्हानही उभे केले.त्याचवेळी या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्न प्राधान्याने मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील परिंचे, वीर, मांडकी यांसह विविध गावांना भेट देऊन पाझर तलाव, विहिरी आणि करपलेल्या पिकांची पाहणी केली.या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर असल्याचेही त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना अधोरेखित केले.पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकांचे नुकसान आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.कारण अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केवळ आश्वासनांपेक्षा ठोस निर्णयांची गरज असल्याचा मुद्दा त्यांच्या मागण्यांतून पुढे आला.
कर्जमाफीची मागणी.....; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष....
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी १०० टक्के कर्जमाफी जाहीर करावी,अशी स्पष्ट मागणी शरद पवार यांनी केली.कारण पीक हातचे गेल्यानंतर कर्जाची परतफेड कशी करायची, पुढील हंगामासाठी भांडवल कुठून उभे करायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमाफीची मागणी महत्त्वाची ठरली आहे.मात्र, कर्जमाफीची मागणी आणि सरकारचा प्रत्यक्ष निर्णय यांत अद्याप अंतर आहे.त्यामुळे आता पवार यांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते, तसेच कर्जमाफीबाबत कोणती ठोस कार्यवाही होते, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.कारण आज टँकर, वीज आणि दुष्काळी यादीचा पेच दुष्काळाची तीव्रता वाढत असलेल्या भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आणून देत पवार यांनी आवश्यक ठिकाणी तातडीने सरकारी टँकर सुरू करण्याचीही मागणी केली.त्यातच आता पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह पशुधनालाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
दुसरीकडे, परिस्थिती गंभीर असूनही काही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश झालेला नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन अशा भागांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली.त्याचवेळी त्यांनी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये, असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कोणते मुद्दे मांडणार..?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारशी चर्चा सुरू असल्याचे सांगत पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे संकेत दिले.या भेटीत संपूर्ण कर्जमाफी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, दुष्काळी यादीतून वगळलेल्या तालुक्यांचा समावेश आणि वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे प्रश्न प्राधान्याने मांडले जाणार आहेत.
त्यामुळे आता पवार यांच्या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.मात्र, पाहणी दौऱ्यात मांडलेल्या मागण्यांचे रूपांतर प्रत्यक्ष मदतीत कधी होते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.त्यातही कर्जमाफी बाबत सरकार काय निर्णय घेते, पाणीटंचाईवर किती तत्परतेने उपाययोजना करते आणि वंचित तालुक्यांच्या दुष्काळी स्थितीचा फेरआढावा घेते का, यावर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दिलाशाचे स्वरूप ठरणार आहे. .........................(समाप्त)..................